Imgage
Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation LinksSkip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links Skip Navigation Links

  पदयात्रा दिनक्रम
आम्ही सर्व साईभक्त आम्हांस साईंच्या भक्तीची ओढ लावणाऱ्या अशा शिस्तप्रिय संन्थेचे सभासद. साईंच्या कृपेने आम्ही सर्व दरवर्षी रामनवमी उत्स्वानिमित या पालखी सोबत चालतोय कुणाच्या हातात निशाण तर कुणाच्या हातात अबदागिरी कुणाच्या हातात राजदंड तर कुणाच्या हातात चवरी, कुणी छत्र धरून चालतोय, तर कुणी चक्‍क पालखीला खांदा लावुन चालतोय, जमेल तशी जमेल तितकी साईंची सेवा करतोय. साईंच्या पादुका आणि तसबीर तर पालखीत वीराजमान असतेच. या सर्व गोष्टी खांद्यावर घेवुन चालता चालता शिरडी कधी येते कळतच नाही. परंतू मुंबई ते शिरडीच्या या प्रवासात आमचा दिनक्रम कसा असतो असा प्रश्न अनेक साईभक्तांना पडतो. खरंतर या सपूंर्ण प्रवसात मनूष्यबळ, अर्थ व्यवस्था, भोजन व्यवस्था, मंडप व्यवस्था, पाणी वाटप व्यवस्था, पूजा व्यवस्था, प्रथमोपचार व्यवस्था, निवास व्यवस्था इत्यादी व्यवस्थांचे पद्धतशीर नियोजन करणे व सर्व कार्यकर्त्यांवर दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी जबाबदारीने व वेळेवर पाडणे यातच पदयात्रेचे यश सामावले आहे. ते कसे तर मुंबई येथील जे. हसन बिल्डिंग लोअर परेल येथून आमची पदयात्रा सकाळी ७:०० वाजता, साईंच्या तसबीरीचे / पादूकांचे षोडोपचाराने पूजन करुन व त्यांना पालखीत विराजमान करुन पदयात्रा मार्गदर्शिकेत नमूद केल्याप्रमाणे श्रीसिद्धिविनायकाचे व अक्कलकोट स्वामींचे दर्शन करुन दुपारच्या मुक्कामी निघते. ज्या ठिकाणी मध्यान्ह होईल तिथेच साईंची आरती करुन पूढे मार्गक्रमण केले जाते. मार्गक्रमण करता करता अनेक सामाजिक संस्था, मंदिर ट्रस्ट व अनेक साईभक्त साईपालखीचे वाटेत यथोचित स्वागत करतात. पालखी दुपारच्या मुक्कामी पोहोचेपर्यंत सकाळी आमचे मंडप व्यवस्थापक, भोजन व्यवस्थापक आप-आपल्या सामग्री सहीत दुपारच्या मुक्कामी पोहोचलेले असतात व दुपारच्या जेवणाची संपुर्ण व्यवस्था तयारच असते. पालखी मुक्कामी पोहोचली की थोडी विश्रांती घेवुन पदयात्रींना दुपारचा साई भंडारा दिला जातो. थोडया वेळाने चहा व बिस्किटे खाऊन पुन्हा पालखी सायंकाळच्या मुक्कामासाठी निघते. पुन्हा दुपारच्या मुक्कामाचे सर्व आटपून पुढील व्यवस्थेसाठी मंडप व भोजन व्यवस्थापक सायंकाळच्या मुक्कामी पोहोचतात. वाटेत सायंकाळी सुर्यास्ताच्या वेळी साईंची आरती केली जाते व त्याच ठिकाणी भोजन व्यवस्थेतुन छोट्या गाडीने पाठविलेला नास्ता दिला जातो, अर्थात त्या बरोबर गरम गरम चहा असतोच. पुन्हा रात्रीच्या मुक्कामाकरिता पालखी खांदयावर घेऊन भोई निघतात. आता मात्र पाय झपझप उचलले जातात कारण आजूबाजूला अंधार असतो. दिवसभर चालून थकलेली पावलं साई नामाचा अखंड जप करत प्रफ़ुल्लीत होऊन अखंडपणे पडत असतात. रात्रीच्या मुक्कामी पोहोचल्यानंतर पालखी नियोजित ठिकाणी व्यवस्थित ठेवून सर्व पदयात्री हातपाय धुवून भंडाऱ्याला बसतात आणि काही भक्तगण चक्क पालखी समोर भजन गायला बसतात. एका पेक्षा एक असे बुवांचे भजन ऐकता ऐकता दिवसभराच्या थकव्यामूळे झोप कधी लागते ते कळतच नाही. आप-आपल्या बॅगा उशाजवळ घेवून सर्वजण झोपतात पण जागता पहारा असतो तो आमच्या सुरक्षा व्यवस्थेतील पदयात्रींचा दिवस सुरु होतो. एकमेकांना उठवत चार पाच जण चक्क पुजेकरीता थंड पाण्यानेच आंघोळ करुन पालखी जवळ येतात. कुणी गंध उगाळतोय तर कुणी चंदन, कुणी दिवा बत्ती लावतो, तर कूणी धुप पेटवतोय, एक जण बाबांच्या पादूका, तसबीर, दंड, चवरी, गादी इत्यादी वस्तु पुसून पुन्हा पालखीत मांडतो व चंदनाचा लेप पादूकांवर चढवून संपूर्ण पालखीची पूजा केली जाते. यावेळी होणाऱ्या आवाजाने (कुजबुज) आजुबाजूचे पदयात्री जागे होतात. आपल्या पूर्वीच उठून काहीजण तयार होऊन बाबांची पूजा करताहेत हे पाहून ते पदयात्री उत्साहाने उठतात, उठताना थोडासा त्रास होतो कारण पहिल्या दिवसाच्या त्रासानंतर मिळालेली ती पहिली विश्रांती असतेन म्हणून मग मात्र सर्वांना उठविण्यासाठी मोठया मोठयाने शिट्या वाजविल्या जातात. आणि सर्व पदयात्री आपली तयारी करून बॅग भरतात व ती बॅगांच्या गाडीत ठेवतात व चहा बिस्किटे खाऊन हा हा म्हणता सर्व पदयात्री पालखी जवळ जमा होतात. बाबांचे नामस्मरण करून पालखी खांद्यावर घेतली जाते. सर्व प्रथम निशाणप्रमुख आपल्या पालखीचे भगवे निशाण घेवून मार्गक्रमण सुरु करतो. त्याच्या मागोमाग पदयात्रींची रांग हळूहळू चालू लागते. त्यानंतर अबदागिरी, मग राजदंड आणि त्यांच्या मागोमाग बाबांची पालखी. पहाटेची वेळ सकाळचे चार सव्वाचारची वेळ झालेली असते आणि पदयात्री रस्त्यावरून पालखी ठेवून चालत असतात. पालखी सोबत चालण्याऱ्यांपैकी एकाच्या हातात असते अगरबत्ती, त्या अगरबत्तीचा मंद सुगंध आणि नामस्मरणाच्या आवाजाला पालखीच्या घुंघरांच्या आवाजाची साथ आणि त्या तालावर पडणारी पावलं अतिशय वेगाने चालत असतात. त्यामुळे गारवा फारसा त्रासदायक वाटत नाही. हळूहळू संपूर्ण पदयात्रींची एक मोठीच्या मोठी रांग रस्त्याच्या कडेला दिसते आणि त्यावर पडतात सुर्यनारायणाची पहिली किरणं. तांबड फुटायला लागताच डोळ्यावरची झोपेची धुंदी निघून जाते. सर्व क्षीण नाहीसा होतो आणि आता खऱ्या अर्थाने आम्हां सर्वांचा दिवस सुरु होतो. आळस झटकुन आणि भोजन व्यवस्थेतुन पाठविलेला नास्ता व चहा घेवून पुन्हा नव्या जोमाने पदयात्री चालू लागतात, पण कोवळी उन्हं आता प्रखर वाटायला लागतात आणि बाबांच्या पालखीवर भरजरीचे छत्र धरले जाते आणि स्वत:च्या डोक्यावर टोपी घालुन पदयात्री चालत राहतात. पदयात्रींना जेव्हा जेव्हा तहान लागते तेव्हा तेव्हा पाणी व्यवस्थेतील सेवेकरी पाण्याच्या गाड्‍या घेऊन ठिक-ठिकाणी उभे असतात. त्यामुळे लागेल तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होते. चालून चालून आता थकलेले पदयात्री पुढे मागे पुढे मागे असे करत पालखी घेऊन माध्यान्हांपूर्वीच दुपारच्या मुक्कामी पोहोचतात. तेथे गेल्यावर थोडीशी विश्रांती घेवून सर्व पदयात्री आप-आपल्या बॅगा आपल्या ताब्यात घेऊन आपली तयारी करतात व दुपारी ठिक बारा वाजता बाबांची आरती होते. मग नैवेद्य दाखवून सर्वजण बाबांचा प्रसाद घेऊन थोडीशी वामकुक्षी करतात आणि पुन्हा दुपारी चार सव्वा चारच्या दरम्यान निशाणामागोमाग हळूहळू पदयात्री चालू लागतात. दुपारच्या मुक्कामी ज्या स्थानिक लोकांनी पालखीसाठी व्यवस्था केलेली असते, असे काही जण पालखीसोबत पालखीला खांदा लावून चार पावले चालण्यासाठी येतात. त्यांचा निरोप घेऊन, पदयात्री पालखी खांद्यावर घेऊन पुढे मार्गक्रमण करतात. मग सुर्य मावळेपर्यंत पदयात्रींची चालण्याची गती अजिबात मंदावत नाही. सुर्यास्तापूर्वीच काही काळ पालखी थांबवली जाते. तेथेच बाबांची सांज आरती घेऊन सायंकाळचा चहा-नाश्ता केला जातो. यानंतर सर्व काही पहिल्या दिवसाप्रमाणेच होते. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, सर्व दिवशी दुसऱ्या दिवसाप्रमाणेच नित्यक्रम असतो. फ़क्त बदल असतो तो भोजन व्यवस्थेतील कल्पक आचारी श्रीयुत गावडे व त्यांचे सहकारी यांच्यामुळे पदयात्री जेवणातील पदार्थामध्ये एकापेक्षा एक अशा वेगवेगळ्या पदार्थामुळे पदयात्री जेवणाला कंटाळत नाहीत आणि त्याचा त्यांना त्रासही होत नाही. आपण फक्त चालावं बाकी सर्व पदाधिकारी आणि व्यस्थाप्रमुख बघतील अशी भावना पदयात्रींची मुळीच नसते. चालता चालता प्रत्येक पदयात्री सेवेकरी म्हणून कामही करत असतो. उदा. थकलेल्यांना आधार देणं, हळू चालणाऱ्यांना हाताला धरुन त्यांची गती वाढवणं, वयस्कर पदयात्रींबरोबर चालणं, त्यांची सेवा करणं इ. परंतु एवढं सगळ व्यवस्थित करुनही जर कुणी आजारी असेल तर त्यास आमच्या संस्थेतर्फे प्रथोमोपचार केले जातात. परंतु एक अशी संस्था, अशी जी आमच्या सर्व पदयात्रींना आपली वाटते त्या संस्थेतील डॉक्टर पदयात्रेकरूंवर उपचार नाहीत तर त्यांच्या दृष्टीने साईसेवाच करतात. अशी संस्था म्हणजे "गुरुस्थान चॅरिटेबल ट्रस्ट" कै. डॉ. पितळे यांनी या संस्थेची स्थापना केली आणि साईसेवेचे एक अनोखे व्रत हाती घेतले.